ग्राम विकासाला गांधीजींच्या विचारांची गरज!

३० जानेवारी १९४८ च्या संध्याकाळी नथुरामच्या बंदुकीच्या गोळीने महात्म्याचा जीव घेतला. जगभरात संतापाची लाट आली मात्र त्याचवेळी जीव संपवला तरी तुम्ही गांधीजींचा विचार कसा संपवणार हि भूमिका पुढे आली आणि अनेकांनी गांधीजींचा विचार पुढे नेण्याचे काम केले हे खरे मात्र आज गांधीजींचा विचारही संपवण्याचे प्रयत्न पद्धतशीरपणे सुरु आहेत आणि एक भारतीय म्हणून ते अंमलात आणणे आपल्याला अवघड वाटते.

ग्राम विकासाला गांधीजींच्या विचारांची गरज!

ग्राम विकासाला गांधीजींच्या विचारांची गरज!

३० जानेवारी १९४८ च्या संध्याकाळी नथुरामच्या बंदुकीच्या गोळीने महात्म्याचा जीव घेतला. जगभरात संतापाची लाट आली मात्र त्याचवेळी जीव संपवला तरी तुम्ही गांधीजींचा विचार कसा संपवणार हि भूमिका पुढे आली आणि अनेकांनी गांधीजींचा विचार पुढे नेण्याचे काम केले हे खरे मात्र आज गांधीजींचा विचारही संपवण्याचे प्रयत्न पद्धतशीरपणे सुरु आहेत आणि एक भारतीय म्हणून ते अंमलात आणणे आपल्याला अवघड वाटते.  

'सत्य, असहकार, कायदेभंग, अहिंसा व चले जावं' या गांधी विचारांचा स्वातंत्र चळवळी मध्ये सिंहाचा वाटा होता. अनेक स्वातंत्र्य वीरांचे बलिदान व गांधीजींच्या सत्य व अहिंसा या तत्वांवर विविध घटकांतील लोकांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिले होते. यामुळेच आपल्या देशाने इंग्रजांची १५० वर्षाची जुलमी राजवट संपवून स्वातंत्र्याची पहाट बघितली होती. यामुळेच भारतीयांसह सर्व जगाला आजही गांधीवादी विचारांची भुरळ पडली आहे. महात्मा गांधीजी सारखा एक हाडांमासांचा माणूस की ज्याने सत्यवादी व अहिंसक विचारातून सर्व देश एकत्र केला. हे कदाचित भविष्यकाळातील तरुण पिढ्यांना पटणार नाही,' असे उद्गार थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी व्यक्त केले होते.

स्वातंत्र्य मिळालं आता पुढे काय? मात्र गांधीजींची दिशा स्पष्ट होती. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 'खेड्यांकडे चला' हा नारा गांधीजींनी दिला होता; कारण भारत हा खेड्यांचा देश आहे. त्याकाळीच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दलित शोषित समाजाला शहरांकडे चला हा संदेश दिला होता. दोघांच्या भूमिका म्हणून तत्कालीन काळात त्या योग्य होत्या मात्र आज शहरे असो वा खेडी दोन्ही ठिकाणी ती परिस्थिती नाही. गांधीजींच्या मते, भारतीय संस्कृती व परंपरा या प्रामुख्याने खेड्यांमध्येच असल्यामुळे खेडी हा भारत देशाचा आत्मा आहे. यासाठी खेड्यांमधील सर्वात दुर्लक्षित असलेला घटक हासुद्धा विकासाच्या प्रवाहात आणावा लागेल. प्रत्येक कुटुंब व प्रत्येक गाव हे स्वयंपूर्ण झालं पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते. म्हणूनच ग्राम स्वराज्य व श्रमसंस्कार यांवर त्यांचा भर होता. स्वच्छता ही देशाच्या स्वातंत्र्या इतकीच महत्वाची आहे असे त्यांचे मत होते आणि म्हणूनच वैयक्तिक स्वच्छता व गावांची सार्वजनिक स्वच्छता याबद्दल ते खूप आग्रही होते. भारतातील खेडी ग्रामसफाईने स्वच्छ झाली तरच समृद्ध होऊ शकतील. घरातील शौचालय हे घरातील देवघर व स्वयंपाकाच्या खोलीसारखे स्वच्छ ठेवले पाहिजे.अशी गगांधीजींची भूमिका होती.
आज मात्र यासाठी कसोशीने प्रयत्न सर्वच पातळीवर करण्याची गरज आहे. गावे  हागणदारी मुक्त करणे ही आपली प्राथमिक गरज असली तरी आज गावांमध्ये पाण्याचे नियोजन ही अत्यंत महत्वाची बाब आहे. महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघतो आहे. अशा परिस्थितीत मृदा व जलसंधारण प्रकल्प फक्त शासनाच्या स्तरावर नव्हे तर लोकांच्या सहकार्याने आणि लोकांच्या देखरेखीत योग्य अंमलबजावणी करून राबविणे गरजेचे आहे. पिण्याच्या, शेतीच्या व जनावरांना वापरावयाच्या पाण्याचे योग्य नियोजन आज करणे गरजेचे आहे. गाव शिवारात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा दरवर्षी ताळेबंद मांडून त्यानुसार कोणती पिके घ्यायची जेणेकरून पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही, याच्या नियोजनाचे आदर्श उदाहरण आपल्याच राज्यातील राळेगणसिद्धी, हिवरेबाजार, निढळ, कडवंची, गणेशवाडी व अन्य काही गावांनी घालून दिले आहे. पाणी उपलब्धतेनुसार पीक नियोजन ही काळाची गरज आहे. या पद्धतीचे नियोजन केले तरच हागणदारीचे पण उद्दिष्ट साध्य करू शकू आणि गावाला देखील दुष्काळाच्या छायेतून बाहेर काढण्यास मदत करता येईल मात्र या गांधी विचारांचा आपल्याला विसर पडलेला असतो.  

बदलत्या काळात बदलत्या हवामानानुसार पिकांचे नियोजन असो वा उत्पादन वाढविण्यासाठी गाव स्तरावर प्रयत्न करणे असो याचेही मूळ आपल्याला गांधीजींच्या विचारात शोधावे लागेल. कौशल्य विकासाच्या नावाखाली योजना राबवून पुण्या-मुंबई करिता सात-आठ हजार रुपये मिळवून देणारे कौशल्य नको तर जिल्हा व गावपातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी शेतीशी व ग्रामीण भागाशी निगडीत कौशल्याचे धडे आज द्यावे लागेल. ग्रामीण भागातच लघु उद्योगांच्या प्रोत्साहनासह महाराष्टाच्या सहकार क्षेत्राला पुन्हा एकदा बळकट द्यावी लागेल. 

गांधींजी म्हणायचे, स्वतःच्या आचरणातून निर्माण झालेल्या समस्या स्वतः सोडविल्या पाहिजे. गांधीजी स्वतः साफसफाई करत. याविचारातूनच त्या काळात भंगीमुक्ती चळवळ उदयास आली होती. गांधीजींचे ग्रामसफाई व ग्रामोद्योग यावर त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. कचरा व मानवी विष्टेपासून शेतीसाठी उत्तम खत तयार होऊ शकते यासाठी त्यांनी स्वतः गावात फिरून खत तयार करण्याचा प्रयोग लोकांना समजून सांगितला होता या प्रयोगांचं आज काय झालं याचा विचार आपल्याला करणे गरजेचं आहे.  

गावाच्या पातळीवर आज शिक्षण, स्वच्छता, पायाभूत सुविधा, शाश्वत शेती, सिंचनाच्या सुविधा, पिण्याचं स्वच्छ व मुबलक पाणी, आरोग्याच्या सोयी आणि तंटामुक्त गाव या बाबींचा काही गावांचा अपवाद वगळता पुरता बोजवारा उडाला आहे. कदाचित हे देखील आपण गांधी विचारापासून दूर गेल्याचे लक्षण असेल. याकरिता गांधीजींचा विचार मानणाऱ्या लोकांनी स्वतःमधील अहं बाजूला ठेवून तरुणांना सोबत घेऊन योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी काम करावं लागणार आहे. भारतीय खेड्यांची वाटचाल ग्रामस्वराज्याच्या दिशेने व्हावी यासाठी गांधीजींचा आग्रह होता. मात्र ते एक कृतिशील विचारवंत होते. स्वतः उच्च विद्याविभूषित असताना सुद्धा ते ग्रामसफाई व श्रमदान आनंदाने करीत असत. हातात झाडू घेऊन दलित वस्त्या सुद्धा स्वच्छ करीत होते. याबद्दल त्यांना कधीही कमीपणा वाटला नाही. आज मात्र स्वच्छ भारत अभियानाचे मी तयार आहे स्वच्छ सर्वेक्षणासाठी या रंगवलेल्या भिंतींच्या पलीकडे काही दिसत नाही. 
आज गांधीजींची आणि गांधी विचारांची देखील काही जण अपुऱ्या माहितीमुळे वा कुजबुज तंत्रामुळे टिंगलटवाळी व कुचेष्टाही करतात. त्यांची खरच कीव वाटते तर काही जण फक्त भाषणात गांधीजींचे नाव घेणे पसंद करतात मात्र त्यांची कृती शून्य दिसून येते. गांधीजींना नावे ठेवणे सोपे आहे, परंतु गांधीजींच्या तत्वज्ञाना प्रमाणे आचरण करणे खूपच कठीण आहे याचे भान सर्वानीच ठेवणे आवश्यक आहे. गांधीजींच्या विचाराने, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांच्या विचाराने स्वच्छता व ग्रामसफाईच्या विचारांचे आचरण आज कित्येक गावात सुरू आहे. काही सरपंचांनी तर गावाच्या समृद्धीसाठी आपले आयुष्य वेचले आहे. यामध्ये काही अधिकारी सुद्धा कार्यमग्न होऊन सतत कार्यरत आहे याला व्यापक पातळीवर घेऊन जाणे गरजचे आहे.

ग्राम विकासासारख्या व्यापक क्षेत्राला आज पुन्हा एकदा या महापुरुषांच्या विचाराने पहावयाची गरज आहे. प्रशासनाला आपला अंमलबजावणी चा दृष्टिकोन बदलावा लागणार आहे. लोकांना विश्वासात घेऊन योजनांची अंमलबजावणी करावी लागेल. सोबतच गावांची परिस्थिती बदलण्यासाठी लहानांपासून जेष्ठांपर्यंत सर्वानीच यामध्ये सक्रियता दाखवणे ही उज्वल भविष्यासाठी व खेड्यांच्या शाश्वत विकासासाठी काळाची गरज बनली आहे.

श्री. निकेश आमने पाटील 

( लेखक ग्रामीण विकास विषयाचे अभ्यासक आहेत) 

What's Your Reaction?

like
9
dislike
1
love
3
funny
0
angry
0
sad
0
wow
1