सारं काही सातबारा विषयी !!!!!

गाव नमुना सात बारा हा एक प्रकारे जमिनीचा आरसाच असतो. गाव नमुना सात बारा हे हक्क नोंद आणि पीक पाहणी पत्रक अशा स्वरुपात असते. गाव नमुना सात मध्ये हक्क नोंद असते तर गाव नमुना बारा मध्ये पिकाखालील आणि पडीक असलेल्या जमिनीची एकूण आकडेवारी दिलेली असते. व्यवहारात जरी आपण ७/१२ चा उतारा म्हणत असलो तरी प्रत्यक्षात ते दोन उतारे असतात. हे दोन्ही उतारे बऱ्याचदा एका खाली एक किंवा कागदाच्या एका बाजूला गाव नमुना सात (७) व मागील बाजूला गाव नमुना बारा (१२) छापलेला असतो.

सारं काही सातबारा विषयी !!!!!

जमिनीचा ७/१२ चा उतारा

जमिनीच्या ७/१२ च्या उताऱ्यावरून जमिनी संबधी अनेक गोष्टी समजतात. त्या गोष्टी पुढीलप्रमाणे :

 1. जमिनीची मालकी कुणाच्या नावावर आहे हे ७/१२ चा उतारा पाहिल्यावर आपणास तात्काळ समजू शकते.
 2. ७/१२ च्या उताऱ्यावरील गोलातील आकड्याच्या क्रमांकावरून ही मालकी ७/१२ वर कशी आली याची माहिती आपण काढू शकतो.
 3. ७/१२ च्या उताऱ्या वरून जमिनीवर मालका व्यतिरिक्त अन्य कुणाचे हक्क आहेत किंवा कसे याची माहिती आपणाला होते. आता हे हक्क कोणते ते पुढील प्रमाणे :
  1. जमिनीला कुणाचे कुळ लागले आहे काय ?
  2. जमिनीवर कसला बोजा आहे काय?
  3. सरकारी अथवा वित्त संस्थेचे कर्ज व बोजा या जमिनीवर आहे का?
  4. दान, पोटगी, गहाण अशा प्रकारचा अथवा सरकारी कर्ज, बँकेचे कर्ज, सबसिडी अशा प्रकारचा कोणता बोजा जमिनीवर आहे काय?
  5. कुळ असल्यास कोणत्या प्रकारचे कुळ आहे?
 4. ७/१२ च्या उताऱ्या वरून पुढील काही महत्वाच्या गोष्टी आपणाला कळू शकतात,
  1. जमिनीचा भूमापन क्रमांक
  2. जमिनीचा हिस्सा क्रमांक
  3. जमिनीचे स्थानिक नाव
  4. जमिनीचा सारा
  5. जमिनीचे क्षेत्रफळ

गाव नमुना क्रमांक सात :

या गाव नमुन्‍याला महसुली भाषेत 'अधिकार अभिलेख पत्रक' असेही म्‍हणतात. 'महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्‍या (तयार करणे व सुस्‍थितीत ठेवणे नियम १९७१' यातील नियम ३, ५, ६ आणि ७ मध्‍ये पहिल्‍यांदा सात-बारा कसा तयार करावा याचे मार्गदर्शन केले गेले आहे.

गाव नमुना सात-बारा मधील वरचा भाग हा गाव नमुना सात असतो, जो गाव नमुना सहा (फेरफारांची नोदवही) ची सूची असतो. यात मुख्‍यत्‍वे तीन स्‍तंभ (रकाने) असतात.

(१) डावीकडील स्तंभ, (२) मध्य स्तंभ आणि (३) उजवीकडील स्तंभ.

सात-बाराच्‍या वरच्‍या भागात प्रथम गावाचे (मौजे) नाव, तालुक्‍याचे नाव आणि जिल्‍ह्‍याचे नाव नमुद असते.

() गाव नमुना सातचे डावीकडील स्तंभ:

गाव नमुना सातच्‍या (गावाच्‍या, तालुक्‍याच्‍या, जिल्‍ह्‍याच्‍या नावाखाली), डावीकडील स्‍तंभात (रकान्‍यात) शेत जमीनीचा भुमापन क्रमांक, (भुमापन क्रमांकची व्याख्या 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम २(३७)मध्ये नमूद आहे.)उपविभाग/पोट हिस्‍सा क्रमांक नमुद असतो. (उपविभाग/पोट हिस्सा क्रमांकाची व्याख्या 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम २(३५) मध्ये नमूद आहे.) पोट हिस्स्यांची नोंद गाव नमुना सहा-ड मध्येही केली जाते.

याच्‍या खालील ओळीत त्‍या शेत जमीनीची धारणा पध्‍दती(भोगवटादार वर्ग १ किंवा वर्ग २ किंवा शासकीय पट्टेदार)नमुद केली जाते.

भोगवटादार-१ म्‍हणजे ज्‍या शेतजमीनीचा मालक शेतकरी स्‍वत: असतो. अशा जमीनीची विक्री करण्‍यासाठी त्‍या शेतकर्‍यावर कोणतेही बंधन नसते किंवा कोणाच्‍याही परवानगीची आवश्‍यकता नसते. अशा शेतजमीनीला बिनदुमाला किंवा खालसा जमीनही म्‍हणतात. (भोगवटादार वर्ग १ ची व्याख्या 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम २९(२) मध्ये नमूद आहे.)  

भोगवटादार-२ म्‍हणजे ज्‍या शेतजमीनीचा मालक शेतकरी स्‍वत: नसतो. अशी जमीनीचे हस्‍तांतरण करण्‍याच्‍या हक्‍कावर शासनाचे निर्बंध असतात. अशा जमीनीची विक्री करण्‍यासाठी त्‍या शेतकर्‍यावर काही बंधने/अटी असतात आणि त्‍यासाठी सक्षम अधिकार्‍याच्‍या परवानगी आणि काही शासकीय सोपस्‍कार पूर्ण करण्‍याची आवश्‍यकता असते. अशा शेत जमीनीला दुमाला किंवा नियंत्रीत सत्ता प्रकारची, शर्तीची जमीन असेही म्‍हणतात. (भोगवटादार वर्ग २ ची व्याख्या 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम २९(३) मध्ये नमूद आहे.) भोगवटादार २ ची नोंद गाव नमुना क्रमांक एक-क मध्‍येही केली जाते. 

शासकीय पट्टेदार म्‍हणजे ज्‍यांना ठराविक मुदतीसाठी शासनाकडून वहिवाटण्‍यासाठी भाडेतत्‍वावर जमीन देण्‍यात आली आहे अशी व्‍यक्‍ती. (शासकीय पट्टेदारची व्याख्या 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम २(११) मध्ये नमूद आहे.)  

गाव नमुना सातवर शेत जमीनीची धारणा पध्‍दतीच्‍या खालील ओळीत त्‍या शेत जमीनीला ज्‍या स्‍थानिक नावाने ओळखले जाते असे स्‍थानिक नाव लिहीले जाते. स्‍थानिक नावाखालील ओळीत लागवडीयोग्‍य क्षेत्र लिहीले जाते. या लागवडीयोग्‍य क्षेत्राचे

(१) जिरायत क्षेत्र आणि (२) बागायत क्षेत्र असे प्रकार लिहीले जातात. जिरायत क्षेत्र आणि बागायत क्षेत्र स्‍वतंत्रपणे लिहून त्‍याखाली या दोघांचे एकुण क्षेत्र लिहीले जाते.

जिरायत क्षेत्र म्‍हणजे पावसाच्‍या पाण्‍यावर अवलंबून असलेले क्षेत्र आणि बागायत क्षेत्र म्‍हणजे इतर सिंचन साधनांपासून (कालवा, कुप नलिका ई.) पाणी मिळणारे क्षेत्र.

प्रचलीत पध्‍द्तीनुसार शेतीचे क्षेत्र हेक्‍टर-आर मध्‍ये लिहीले जाते.

 1. एक आर म्‍हणजे एक गुंठा किंवा ३३ X ३३ फुट  १०८९ चौरस फुट किंवा शंभर चौरस मीटर
 2. एक एकर म्‍हणजे चाळीस आर किंवा चार हजार चौरस मीटर किंवा ४३,५६०  चौरस फूट   
 3. एक हेक्‍टर म्‍हणजे शंभर आर किंवा २.४७ एकर किंवा दहा हजार चौरस मीटर.

जिरायत आणि बागायत क्षेत्राच्‍या बेरजेखाली 'पोटखराब' क्षेत्र लिहीले जाते. 'पोटखराब' क्षेत्र म्हणजे ज्या क्षेत्रात लागवड करता येणे शक्य नाही असे लागवडीयोग्य नसलेले क्षेत्र.

या 'पोटखराब' क्षेत्राचे 'वर्ग अ' आणि 'वर्ग ब' असे दोन भाग पडतात.

'पोटखराब-वर्ग अ' म्‍हणजे खडकाळ क्षेत्र, नाले, खंदक, खाणी इत्‍यादीने व्‍याप्‍त असलेले क्षेत्र.

'पोटखराब-वर्ग अ' अंतर्गत येणार्‍या क्षेत्रावर महसुलाची आकारणी करण्‍यात आलेली नसते. 'पोटखराब-वर्ग अ' प्रकाराखाली येणारी जमीन शेतकर्‍यास कोणत्याही लागवडीखाली आणता येऊ शकते.  तथापि, अशी जमीन आकारणीस पात्र असणार नाही. 'पोटखराब-वर्ग अ' प्रकाराखाली येणार्‍या जमीनीची आकारणी करायची असेल तेव्‍हा त्‍याबाबतचा प्रस्‍ताव तहसिलदारांमार्फत मा. जमाबंदी आयुक्त यांना सादर करून आदेश प्राप्त करावा लागतो. अशा आदेशानंतरच 'पोटखराब-वर्ग अ' प्रकाराखाली येणार्‍या जमीनीची आकारणी करता येते. 'पोटखराब-वर्ग अ' प्रकाराखाली येणार्‍या जमीनीत जर काही पीके घेतली असतील तर पीक पाहणीच्‍या वेळेस अशा पीकांची नोंद घेता येते. 

'पोटखराब वर्ग ब' सार्वजनिक प्रयोजनार्थ म्‍हणजे रस्‍ते, पदपथ किंवा जलप्रवाह, कालवे, तलाव किंवा घरगुती प्रयोजनासाठी वापरणेत येणारे तलाव किवा ओढा यांनी व्यापलेली किंवा कोणत्याही जाती-जमाती मार्फत दहनभूमी किंवा दफनभूमी म्हणून वापरात असणारी किंवा पाण्‍याची टाकी, रहिवास वापर अशा काही विशिष्‍ठ प्रयोजनार्थ राखून ठेवलेली आणि त्‍यामुळे लागवडीसाठी उपलब्‍ध नसलेले क्षेत्र. 'पोटखराब वर्ग ब' क्षेत्रावर कोणत्याही प्रकारची महसूल आकारणी करण्‍यात येत नाही.

पोटखराब 'वर्ग अ' आणि 'वर्ग ब' चे क्षेत्र स्‍वतंत्रपणे लिहून त्‍याखाली एकूण पोटखराब क्षेत्र लिहीले जाते.

 एकुण पोटखराब क्षेत्राखाली त्‍या शेतजमीनीसाठी आकारण्‍यात येणार्‍या महसूलाची रक्‍कम लिहीली जाते. ही रक्‍कम 'रुपये-पैसे' या स्‍वरूपात लिहिली जाते व त्‍याप्रमाणे खातेदाराकडून जमीन महसूल स्‍वरुपात, तलाठी यांच्‍यामार्फत वसूल केली जाते.(जमीन महसूलची व्याख्या 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम २(१९) मध्ये नमूद आहे.)

(२) गाव नमुना सातचा मध्य स्तंभ:

गाव नमुना सातच्‍या मध्‍य स्‍तंभात भोगवटादाराचे नाव लिहिलेले असते. भोगवटादार म्‍हणजे जमिनीचे मालक, कायदेशीररित्‍या जमीन कब्‍ज्‍यात असणार्‍या व्‍यक्‍ती.(भोगवटाची व्याख्या 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम २(२४) आणि भोगवटादारची व्याख्या 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम २(२३) मध्ये नमूद आहे.) त्‍या भोगवटादाराकडे सदर जमीन कशी व कोणत्‍या हक्‍काने आली त्‍याबाबतचा फेरफाराचा क्रमांक त्‍याच्‍या नावाखाली वर्तूळात लिहिलेला असतो. 

(३) गाव नमुना सातचे उजवीकडील स्तंभ:

गाव नमुना सातच्‍या उजवीकडील स्‍तंभात वरील बाजुस खाते क्रमांक नमुद असतो. हा खाते क्रमांक गाव नमुना आठ-अ(खातेदारांची नोंदवही) मधील खातेक्रमांक असतो.  

खाते क्रमांकाखाली गाव नमुना सात-अ(कुळ हक्काबाबतची नोंदवही) ची थोडक्‍यात माहिती असते, यात 'कुळाचे नाव', 'इतर हक्‍क' याची माहिती असते. त्‍या शेतजमीनीत काही कुळ हक्‍क असतील तर त्‍या कुळाची नावे व त्‍याखाली सदर कुळाचा त्‍या जमीनीत कसा व काय हक्‍क आहे त्‍याबाबतचा फेरफाराचा क्रमांक कुळांच्‍या नावाखाली वर्तूळात लिहीलेला असतो.

याशिवाय कुळाच्‍या नावाखाली'इतर हक्‍क' खाली त्‍या जमिनीत इतर व्‍यक्‍ती किंवा संस्‍था यांचे काही हक्‍क असल्‍यास, जसे कर्ज, बँक बोजा, आरक्षण इत्‍यादींशी संबंधीत नावे आणि त्‍याबाबतचा फेरफाराचा क्रमांक, नावाखाली वर्तूळात लिहिलेला असतो. शेत जमीनीत असलेल्‍या विहीर, बोअरवेल यांचा उल्‍लेखही 'इतर हक्‍क' सदरी केला जातो. या स्‍तंभाच्‍या शेवटी सीमा आणि भूमापन चिन्‍हे याची माहिती नमूद असते. यालाच हद्‍दीची निशाणी म्‍हणतात.(हद्दीची निशाणीची व्याख्या 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम २(३) मध्ये नमूद आहे.)    

गाव नमुना बारा :

महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्‍या (तयार करणे आणि सुस्‍थितीतीत ठेवणे) नियम १९७१ मधील नियम २९ अन्‍वये असलेला गाव नमुना बारा (पिकांची नोंदवही) हा तक्‍ता स्‍वरुपात असतो. हा नमुना पिक पहाणी आणि पैसेवारीसाठी अत्‍यंत महत्‍वाचा असतो. याची नोंद गाव नमुना अकरा मध्येही असते.  या गाव नमुना बारामध्‍ये त्‍या शेत जमीनीतील पिकांची आणि जलसिंचनाच्‍या साधनांची सविस्‍तर माहिती असते.

दिनांक ०१/०१/१९७६ पासून 'महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्‍तिका-खंड ४' मध्‍ये विहीत करण्‍यात आलेला गाव नमुना बारा, अंमलात आला. यामध्‍ये पंधरा स्‍तंभ आहेत, पंधरावा स्‍तंभ 'शेरा' हा आहे. १० मे १९७६ रोजीच्‍या शासन परिपत्रकानुसार, गाव नमुना बारामध्‍ये एक स्‍तंभ वाढवण्‍यात यावा आणि स्‍तंभ पंधरामध्‍ये 'प्रत्‍यक्ष लागवड करणार्‍याचे नाव' लिहावे आणि नवीन सोळावा स्‍तंभ शेर्‍यासाठी ठेवावा अशी सुचना देण्‍यात आली होती. मात्र महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्‍या (तयार करणे आणि सुस्‍थितीतीत ठेवणे) नियम १९७१ मधील नियम २९, ३० व ३१ यांचे एकत्रीत वाचन केल्‍यास, ज्‍या व्‍यक्‍तींना अधिकार अभिलेखातील नोंदींप्रमाणे जमीन कसण्‍याचा अधिकार आहे, फक्‍त अशाच व्‍यक्‍तींची नावे स्‍तंभ पंधरामध्‍ये लिहिणे योग्‍य ठरते.

प्रचलीत गाव नमुना बारामध्‍ये पंधरा स्‍तंभच ठेवण्‍यात आले आहेत.     

 1. गाव नमुना बारा- स्‍तंभ-१: यात वर्षाचा उल्‍लेख असतो.
 2. गाव नमुना बारा- स्‍तंभ-२: यात हंगामाचा उल्‍लेख असतो. यात खरीप हंगामात घेतलेली पीके (०१ ऑगस्‍ट ते १५ ऑक्‍टोबर) आणि रब्‍बी हंगामात घेतलेली पीके (१५ नोव्‍हेंबर ते ३१ जानेवारी) यांचा उल्‍लेख असतो.                                               'मिश्र पिकाखालील क्षेत्र' या शिर्षकाखाली एकुण सहा (३ ते ८) स्तंभ येतात.
 3. गाव नमुना बारा- स्‍तंभ-३: येथे मिश्र पिकांना शेतकी विभागाकडून दिलेल्‍या संकेतांकांचा उल्‍लेख असतो.
 4. गाव नमुना बारा- स्‍तंभ-४: शेत जमीनीतील मिश्र पिकाखालील जलसिंचीत क्षेत्र असल्‍यास ते क्षेत्र किती ते येथे हेक्‍टर- आर मध्‍ये लिहीले जाते.
 5. गाव नमुना बारा- स्‍तंभ-५: शेत जमिनीतील मिश्र पिकाखालील अजलसिंचीत क्षेत्र असल्‍यास ते क्षेत्र किती ते येथे हेक्‍टर- आर मध्‍ये लिहिले जाते.
 6. गाव नमुना बारा- स्‍तंभ-६: या स्‍तंभात काही घटक पिके असल्‍यास त्‍या घटक पिकाचे नाव लिहिले जाते.
 7. गाव नमुना बारा- स्‍तंभ-७: या स्‍तंभात घटक पिकाखालील जलसिंचीत क्षेत्र, हेक्‍टर- आर मध्‍ये लिहिले जाते.
 8. गाव नमुना बारा- स्‍तंभ-८: या स्‍तंभात घटक पिकाखालील अजलसिंचीत क्षेत्र, हेक्‍टर- आर मध्‍ये लिहिले जाते.                                                                                                                                                    'निर्भेळ पिकाखालील क्षेत्र' या शिर्षकाखाली एकूण तीन (९ ते ११) स्तंभ येतात.
 9. नमुना बारा- स्‍तंभ-९: या स्‍तंभात निर्भेळ पिकाचे नाव लिहिले जाते.
 10. गाव नमुना बारा- स्‍तंभ-१०: शेत जमीनीतील निर्भेळ पिकाखालील जलसिंचीत क्षेत्र असल्‍यास ते क्षेत्र किती ते येथे हेक्‍टर- आर मध्‍ये लिहिले जाते.
 11. गाव नमुना बारा- स्‍तंभ-११: शेत जमीनीतील निर्भेळ पिकाखालील अजलसिंचीत क्षेत्र असल्‍यास ते क्षेत्र किती ते येथे हेक्‍टर- आर मध्‍ये लिहिले जाते.                                                                                                                            'लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन' या शिर्षकाखाली एकूण दोन (१२ ते १३) स्तंभ येतात.
 12. गाव नमुना बारा- स्‍तंभ-१२: यात लागवडीसाठी उपलब्‍ध नसलेल्‍या जमिनीच्‍या स्‍वरुपाचे वर्णन लिहितात. म्‍हणजे कोणत्‍या कारणामुळे सदरचे क्षेत्र लागवडीसाठी उपलब्‍ध नाही. उदा. विहीरीमुळे, पड असल्‍यामुळे, घर असल्‍यामुळे इत्‍यादी. गाव नमुना बाराच्‍या स्‍तंभ बारामध्‍ये पडीक जमिनीचा उल्‍लेख करतांना खाली नमूद आठ विविध प्रकाराखालील जमिनींचा स्‍वतंत्रपणे उल्‍लेख केला जातो.

लागवडीस अयोग्, पडीक जमीन : 

 1.  गावातील सरकारी तसेच खाजगी वनांखालील जमिनीचे क्षेत्र,
 2. डोंगराळ, खडकाळ भाग, वाळवंट, नद्‍यांखालील क्षेत्र, 
 3. इमारती, रेल्‍वे, रस्‍ते, दफनभूमी, सैनिकी छावण्‍या, पाणीपुवठा साधने इत्‍यादी.

 लागवडीस योग्, पडीक जमीन : 

 1. काही विशिष्‍ठ कालावधीसाठी (५ वर्षे किंवा अधिक काळासाठी) पडीक ठेवलेल्‍या जमिनी,
 2. गवताळ आणि गुरे चारण्‍यासाठी वापरण्‍यात येणार्‍या जमिनी,
 3. वनांव्‍यतिरिक्‍त उपयुक्‍त झाडे असलेल्‍या जमिनी, 
 4. इतर पडीक (एक ते पाच वर्षे काळासाठी) जमिनी,
 5. चालू पडीक (वर्षामध्‍ये फक्‍त एकाच हंगामात (खरीप किंवा रब्‍बी)) पडीक ठेवलेल्‍या जमिनी.
 1. गाव नमुना बारा- स्‍तंभ-१३: यात लागवडीसाठी उपलब्‍ध नसलेल्‍या जमिनीचे क्षेत्र, हेक्‍टर- आर मध्‍ये लिहिले जाते. म्‍हणजेच वरील प्रमाणे विहीर किती क्षेत्रात बांधली आहे, किती क्षेत्र पड आहे,  किती क्षेत्रात घर बांधले आहे इत्‍यादी.
 2. गाव नमुना बारा- स्‍तंभ-१४: यात सदर जमिनीत उपलब्‍ध असलेल्‍या जलसिंचनाच्‍या साधनांचा उल्‍लेख असतो. उदा. विहीर, बोअरवेल, पाट, कालवा इत्‍यादी. जलसिंचनाच्‍या साधनांची नोंद गाव नमुना चौदामध्‍येही असते.
 3. गाव नमुना बारा- स्‍तंभ-१५: हा स्‍तंभ शेरा लिहिण्‍यासाठी वापरला जातो.

गाव नमुना बारा मध्ये पोट खराबा आणि पडीत क्षेत्र यांच्यामध्ये भेद दाखवण्याची काळजी घेतली जाते. तसेच सुधारित बियाणे, मिश्र पिके, फळझाड इत्यादींची नोंद या भागामध्ये घेतली जाते. तसेच महाराष्ट्र राज्य झाडे तोडण्यासंबधीच्या १९६६ च्या अधिनियमानुसार जी झाडे तोडण्यास बंदी घातली आहे, अशा सर्व झाडांची नोंद देखील त्यात ठेवली जाते. गाव नमुना बारा मधील या नोंदीमुळे पर्यावरणाचा तोल बिघडवणारी वृक्षतोड अथवा अनधिकृत वृक्षतोड यासंबधीची माहिती तत्काळ मिळणे शक्य होते.  गाव नमुना बारा मध्ये जलसिंचनाचे एखादे पीक घेण्यात येत येत असेल तर त्या जलसिंचनाचा प्रकार या गाव नमुन्या मध्ये नोंदविला जातो. गाव नमुना बारा मध्ये वेगवेगळ्या हंगामात येणाऱ्या पिकांची नोंद केली जाते.

 अधिक माहितीसाठी वाचा :

1) माहिती घेऊया, सातबाराची ! आणि कुळकायद्याची !! लेखक : श्रीनिवास घैसास, मनोरमा प्रकाशन

२) http://eqjcourts.gov.in/images/Act_Laws/MarkeMLRC.pdf

छायाचित्रे साभार :

1) माहिती घेऊया, सातबाराची ! आणि कुळकायद्याची !! लेखक : श्रीनिवास घैसास, मनोरमा प्रकाशन

२) https://mahabhulekh.maharashtra.gov.in

Files

What's Your Reaction?

like
8
dislike
1
love
1
funny
0
angry
0
sad
0
wow
2