व्यथा स्वच्छतेच्या दूतांची

आपल्याकडे सर्व गणवेशधारी व्यवसायांना एक मान किंवा स्टेटस असतो. मग ते सैन्य असो, पोलीस असो, अग्निशमन दल असो वा इतर सेवा. अशाच प्रकारचा गणवेश या सफाई कामगारांना असतो, त्यांचे कार्यही इतरांच्या एवढंच महत्त्वाचं असतं, त्यांनादेखील कामावर सर्वप्रकारची जोखीम पत्करावी लागते. पण खरंच आपण त्यांना इतर गणवेशधारीं इतका मान देतो का? आपल्याला त्यांचं काम माहीत असतं ते काम करत असताना आपण नाक बंद करून मान वळवून तिकडून जातो. आपल्याला त्याचा त्रास होतो पण याचवेळी त्यांना होणाऱ्या त्रासाची तीव्रता आपल्याला जाणवते का? नाही ना! तर आम्ही सांगतो की ते काय अनुभवतात काय त्रास सहन करतात आणि त्या बदल्यात त्यांना काय मिळतं.

व्यथा स्वच्छतेच्या दूतांची

ते रोज दिसतात, ते रोज आपला कचरा उचलतात, आपली सर्व प्रकारची घाण साफ करतात, कुठे गटार तुंबलं तर त्यासाठी स्वतः त्यात उतरतात. कधी दहशतवादी हल्ला होतो कधी पूर येतो कधी रोगाची साथ येते पण ह्या सर्वात देखील ते आपले कर्तव्य पार पाडत असतात, आपली घाण साफ करत असतात. पण या सर्वाच्या बदल्यात आपण त्यांना काय देतो? 'त्यांचं कामच आहे', 'त्यात काय एवढं, प्रत्येकाच्या लायकी नुसारच काम मिळतं', 'फुकट नाही काम करत पैसे मिळतात त्यांना' असे कृतघ्न शब्द! त्यांना पैसे मिळतात हे खरं पण ते जोखीम घेतात त्या बदल्यात त्यांना मिळणारे पैसे खरच पुरेसे असतात का? की त्यांच्या दुप्पट पैसे घेऊन आपण ही जोखीम पार पाडू शकतो? मला माहित आहे आपल्या सर्वांचं "नाही" हेच उत्तर असणार.
   आपल्याकडे सर्व गणवेशधारी व्यवसायांना एक मान किंवा स्टेटस असतो. मग ते सैन्य असो, पोलीस असो, अग्निशमन दल असो वा इतर सेवा. अशाच प्रकारचा गणवेश या सफाई कामगारांना असतो, त्यांचे कार्यही इतरांच्या एवढंच महत्त्वाचं असतं, त्यांनादेखील कामावर सर्वप्रकारची जोखीम पत्करावी लागते. पण खरंच आपण त्यांना इतर गणवेशधारीं इतका मान देतो का? आपल्याला त्यांचं काम माहीत असतं ते काम करत असताना आपण नाक बंद करून मान वळवून तिकडून जातो. आपल्याला त्याचा त्रास होतो पण याचवेळी त्यांना होणाऱ्या त्रासाची तीव्रता आपल्याला जाणवते का? नाही ना! तर आम्ही सांगतो की ते काय अनुभवतात काय त्रास सहन करतात आणि त्या बदल्यात त्यांना काय मिळतं.
   मुंबईत दरवर्षी जुलै मध्ये भयंकर पाऊस पडतो. शहर तुंबतं, सर्वकाही ठप्प होतं, रोग पसरतात. आपण "हे लोक नालेसफाईच नीट नाही करत, फक्त वरच्यावर सर्व करतात" अशी बोलणी सुरू करतो. पण आपण आपल्या शहराची मर्यादा त्याचा भौगोलिक विस्तार त्यात वर्षभर सर्व प्रकारचा आपणच निर्माण करणारा कचरा यांचा विचार मात्र कधीच करत नाही.
   आपण इतकं बोललो तरी पावसाळ्यात आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, साथीचे रोग पसरू नयेत म्हणून अनेक कामगार "विशेष" नालेसफाईच्या कामाला लागतात. ही नालेसफाई पावसाळ्यापूर्वी साधारण दीड महिन्याआधी सुरू होते. मुंबईत सुमारे साडेतीन लाख मीटर लांबीचे लहान मोठे नाले आहेत व त्यातून दरवर्षी चार लाख घनमीटर टन गाळ फक्त पावसाळ्यापूर्वी काढला जातो. यात काही ठिकाणी यंत्राचा वापर केला जातो. पण मुंबईतील सर्वप्रकारच्या दाटीमुळे मोठ्या गटारांमधील गाळदेखील हे कामगार हाताने काढतात आणि मॅनहोल व उघडा सिवरची सफाई करताना अक्षरशः गळा-छातीपर्यंत त्या घाणीच्या गाळात  उतरतात. जी घाण आपल्या डोळ्यासमोर जरी दिसली तरी आपल्याला विचित्र वाटतं, आपलं डोकं दुखत अशा ठिकाणी हे कामगार कोणत्याही सुरक्षा साधनेशिवाय आजही उतरतात. आता यावर लोक बोलतात की "त्यांना सुरक्षेची साधने दिली असतात तरी ते वापरत नाहीत". यावर सफाई कामगार म्हणतात, "पाणी, गाळ व घाण जेव्हा गमबूटात जाते तेव्हा पाय पुढे टाकणंही कठीण होतं, गमबूटामुळे पायाला झालेल्या जखमा कळत सुद्धा नाहीत, हाताने घमेल्यात गाळ भरून वर असलेल्या कामगाराला देताना हात मोजे सैल होतात त्यामुळे आम्ही ते वापरत नाही". यावर खरंच आपण काही ही प्रतिक्रिया देऊ शकतो का? फक्त उदाहरणादाखल सांगतो, पूर्वी आपल्या सैनिकांना जे बुलेट-प्रुफ जॅकेट दिले जायचे ते जड असायचे त्यामुळे युद्ध किंवा लढाईच्या वेळी सैनिक ते जॅकेट फेकून युद्धात लढायचे व मोठ्या प्रमाणात शहीद व्हायचे. ही हानी रोखण्यासाठी आपण संशोधन करून पूर्वीपेक्षा वजनाने हलकी बुलेटप्रूफ जॅकेट सैन्याला दिली. त्यामुळे मनुष्यहानी कमी झाली. आपण सीमेवरील या सैन्यासाठी इतकी चांगली हलकी सुरक्षा साधने उपलब्ध करून दिली मग अशाच प्रकारची सुरक्षा साधने आपल्यासाठी रोज अनेक रोगांची लढणाऱ्या या सफाई सैनिकांना का नाही पुरवू शकत?
   मिथेन, नायट्रोजन, अमोनिया, हायड्रोजन सल्फाईड अशा विविध वायूंची नावं आपण शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत. ह्या वायूंचे प्रमाण जरा जरी वाढलं तरी आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असतं. मग जर समजा तुम्ही या वायूंनी कोंडलेल्या खोलीत रोज राहिलात तर काय होईल? पण काही माणसं हे आयुष्य जगतात तेही फक्त आपल्या सुरक्षेसाठी. ठिकठिकाणी अनेक सफाई कामगार रोज मॅनहोलमध्ये उतरतात. तिथे उतरण्याचं वर्णन त्यांच्याच शब्दात सांगायचं तर "नरकात उतरणं" असतं. या मॅनहोलमध्ये फक्त अंधार, गुडघ्यापर्यंत घाण आणि कधीकधी विषारी वायू असतात. इथे काहीही होऊ शकतं, शेवाळांवरून घसरून पडू शकतात, बेशुद्ध होऊ शकतात किंवा प्रवाहात देखील वाहून जाऊ शकतात आणि तरीही हे सफाई कामगार ही काम करतात. ही सेवा बजावत असताना अनेक जण शहीद होतात पण त्यांची कोणाला खबर नसते, ना त्यांची शाही इतमामात अंत्ययात्रा निघते. उलट "साला दारू पिऊन मेला" अशी घृणास्पद प्रतिक्रिया मिळते.

   या कामगारांच्या मृत्यूचे प्रमाण देखील भयावह आहे. गेल्या दहा वर्षात दरवर्षी सरासरी २००हून अधिक सफाई कामगारांचा सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाला आहे. म्हणजे साधारण दर दोन ते तीन दिवसात एक मृत्यू.
   हे झालेल्या कामगारांच्या कामावरचे आयुष्य पण त्याहून भयानक त्यांचे सामाजिक, आर्थिक, वैयक्तिक जीवन असतं. त्याची व्यथा पुन्हा कधीतरी.

सफाई कामगारांच्या जीवनावर आधारित ही चित्रफित अवश्य पहा...

What's Your Reaction?

like
1
dislike
0
love
1
funny
0
angry
0
sad
0
wow
0