माणसं आणि गरिबीचा शोध - बोध

पूर्वीपासून भारत हा खेड्यांचा  देश आहे असं म्हटलं जातं. आजही भारतात खेड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तरीही आज या परिस्थितीत बदल होत आहेत

माणसं आणि गरिबीचा शोध - बोध

पूर्वीपासून भारत हा खेड्यांचा  देश आहे असं म्हटलं जातं. आजही भारतात खेड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तरीही आज या परिस्थितीत बदल होत आहेत. ग्रामीण भागातील शेती व त्याला पूरक अशा व्यवसायांमुळे अपेक्षित उत्पन्न न मिळणे आणि नैसर्गिक किंवा इतर आपत्तींमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीमुळे होणारे आर्थिक संकट अशा समस्या ग्रामीण भागात निर्माण होत असतात, तसेच आज अनेक खेड्यांचे छोट्या नगरात रुपांतर होत आहे. असं असलं तरी या छोट्या नगरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे आजही ग्रामीण भागातील लोक छोट्या मोठ्या रोजगाराच्या संधीसाठी मोठ्या प्रमाणात शहरी भागात स्थलांतर करतात.

 शहरी भाग सुख सोयीचा, ऐशोआरामाचा अशी सामान्यपणे शहरी भागाचे चित्र रंगवले जाते. पण ही शहराची एक बाजू असते. एखाद्या शहरात जश्या गगनचुंबी इमारती असतात तश्याच दुसऱ्या बाजूला समुद्राप्रमाणे अफाट पसरलेल्या झोपडपट्ट्या असतात. जसं शहराच्या एका कोपऱ्यात, शाही मेजवान्यांची रेलचेल असते, आनंदाच्या उत्सवात विदेशी मद्याचे प्याले रिचवले जात असतात त्याचवेळी शहराच्या दुसऱ्या कोपऱ्यात, काही ठिकाणी एकवेळच्या जेवणासाठी मारामार चालू असते, तर काही ठिकाणी दुःख विसरण्यासाठी, भूक दाबून टाकण्यासाठी बनावट दारूचे ग्लास रिकामी होत असतात.

एकीकडे श्रीमंत मुलांना शाळेत जाण्यासाठी विशेष गाड्यांची सोय असते तर त्याचवेळी दुसरीकडे खेळण्या-बागडण्याच्या वयात अनेक मुलं हात गाड्यांवर राबत असतात. इतक्या मोठ्या प्रमाणात विषमता या सुंदर शहरांमध्ये असते.

हे सर्व एकाएकी घडलेले नाही, अनेक वर्षापासून हे चालत आलेले आहे.  सांख्यिकी आकड्यांवरून आपल्याला ही विषमता पहाता येते. पण त्याचप्रमाणे तत्कालीन लेखकांनी आपल्या कथा-कादंबऱ्या, अनुभव, लेख, रिपोर्ताज यातून देखील हे मांडले आहे त्यापैकीच एक महत्त्वाचे साहित्यिक म्हणजे अनिल अवचट. अनिल अवचट यांच्या "माणसं"मध्ये असेच पाच रिपोर्ताज आहेत. ज्या पुण्यासारख्या मोठ्या शहरात, शहराजवळ राहणाऱ्या ते निपाणीसारख्या विकसनशील शहरात राहणाऱ्या निर्वासित, कामगार, भटके, गरीब-दरिद्री माणसांचं, त्यांच्या कामाचं, त्यांच्या वस्त्यांचं, त्यातील जगण्याचं चित्रण करतात.

पहिल्या कथेत आपल्याला भेटतात १९७९ च्या दुष्काळात होरपळलेली, आपलं घरदार टाकून कुटुंबासह पोटापाण्यासाठी खरंतर जिवंत राहण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आलेली मराठवाड्यातील माणसं. पुण्यातला गणपती उत्सवाचे दिवस होते सर्वत्र गणपतीची धामधूम होती पण त्याच वेळीपुण्यात ही माणसं आली होती व गलिच्छ वस्त्या करुन राहत होती. जगण्यासाठी ही माणसं काहीही करायला तयार होती अगदी भीक मागण्यापासून ते चोरी करण्यापर्यंत काही पण ही काही त्या माणसांची सवय नव्हती, जगण्यासाठी सर्व पर्याय आजमावून पाहत होती. ही माणसे जगण्यासाठी अनेक गोष्टी करायची. काहीजण कागदाचे तुकडे जमा करायची, काहीजण धान्याच्या पोथीतून धुळीत सांडलेले थोडेसे दाणे गोळा करायची.

   पुण्यात ठिकाणी अशा दुष्काळग्रस्तांच्या वस्त्या उभ्या राहिल्या होत्या. तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या माहितीप्रमाणे सात आठ महिन्यापासून यांची सुरुवात झाली होती पण गेल्या तीन महिन्यात हे प्रमाण वाढले होते. इथल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची परिस्थिती सुद्धा वाईटच होती. एक तर गरिबी दारिद्र्य त्यात येथील स्थानिक गुंडांचा त्रास, इथे राहणारे सगळे बाहेरचे होते तरी एखादा नवीन आला तर जुना माणूस त्याला उपरा समजत असे.

   तिथे राहणाऱ्या लोकांची शारीरिक अवस्था तर खूपच दयनीय होती. उघडी शरीरे, रापलेले चेहरे, वाढलेली दाढी, पुढे आलेले डोळे, डोळ्याखाली सूज, चमक गेलेली कातडी अशा परिस्थितीत लोक होते. त्या लोकांनी अंगात जे काय घातलेले ते फाटके होते, शर्ट होता पण शर्टाला एक हातच नव्हता, गळ्याच्या कॉलर जागी प्लास्टिकच्या गुंड्या होत्या, फाटलेली धोतरे होती, त्या धोतरांमधून वाळलेल्या मांड्यावर तगड्या दिसत होत्या.

  आधीच म्हटल्याप्रमाणे हे लोक कोणत्याही प्रकारचे काम करण्यासाठी तयार होते. सकाळी लवकर उठून रस्त्यावरून येऊन उभी राहायचे, खुरपणीला किंवा शेतीच्या कामावर मजूर म्हणून जायचे व स्थानिक मजूरापेक्षा कमी पैशात काम करायचे, गवंड्याच्या हाताखाली काम करायचे, फॅक्टरीत सुट्टीच्या दिवशी मशीन पुसायला आठवड्यातून एकदा जायचे पण तरीही सर्वांना काम मिळायचे असे नाही. यातील काही माणसं भंगार गोळा करण्याचे कामदेखील करायचे. कागद गोळा करायचे, त्याचे गठ्ठे बांधून विकायचे. पत्र्याचे तुकडे खिळे, पट्ट्या, बाटल्यांच्या काचा, फुटलेले बल्ब व इतकंच काय तर हाडंदेखील गोळा करायचे, ही हाडं गोळा करण्यासाठी रानात जायचे, मटणाच्या खानावळी जवळ जायचे, तिथल्या कचऱ्यात शोधून मिळवायचे. पण आता शहरात दिवसेंदिवस यांची संख्या वाढत होती त्यामुळे ही माणसं हा सगळा भंगार गोळा करण्यासाठी बारा-बारा कोस लांब जात असत, दोन-तीन दिवसांनी घरात परत येत‌. तेव्हा कुठे त्यांच्या घरातली चूल पेटत असे.

   ही माणसं ज्या झोपड्यांमध्ये राहतात त्यांची परिस्थिती देखील तितकीच वाईट होती. बांबू रोवून त्यावर उसाचा पाला टाकून पाच सहा फूट बाय तीन-चार फूट इतक्‍या छोट्या झोपड्या, त्यांना बाजूने गवत वाळून पेंढ्या बांधून आडोसे केले होते. काही ठिकाणी बारदान लावलेले होते. 

   इथल्या लहान मुलांची परिस्थिती देखील खूप वाईट होती. पिसवं चावल्यामुळे फोड येत असत व ते फुटले किंवा हा जेवल्यामुळे कातडीची वाट लागत असे. लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण देखील जास्त होते. लहान मुलं जमिनीवरच झोपायची व त्या जमिनींना ओल असायची त्यामुळे दोन दिवसाला एक तरी मूल मरायचं. अनेक मुलं जुलाबामुळे मरायची. मुले जन्माला आली तरी आईच्या अंगावर दूध नव्हतं वधू-वर च दूध आणायची त्यांची ऐपत नसायचे त्यामुळे ते बाळ देखील मरायचं. 

   अशा दयनीय अवस्थेत देखील ही माणसे फक्त जिवंत राहण्यासाठी धडपड करीत होती.

  दुसऱ्या "कोण माणसं कोण जनावरं" या कथेत जनावरांपेक्षा वाईट जीवन जगणाऱ्या कष्टकरी हमालांचे चित्रण केलेले आहे. गुळाची ढेप उचलून पैलवानाचा चिपाड झालेला, पाठ सोलली गेलेला कामगार. मिरची मसाला उद्योगात बंद जागेत, खोकत जमेल तसा श्वास घेत, तिखट सहन करून आयुष्य उजाडलेलं कामगार. बारदान व्यवसायातील टिबी सारख्या आजाराचा त्रास सहन करत जगणारा कामगार. खड्डे असलेली जमीन, त्यामुळे पायाची लागणारी वाट, धुळीने होणारे फुफुसाचे आजार सहन करत, घुशी-साप-किडे त्यांचा वावर असणाऱ्या ठिकाणी अंधाऱ्या गोदामात काम करणारे धान्य बाजारातले हमाल. सिमेंटच्या पावडरने पाठीवर खपली होणारे, चुन्याने माखलेले, खत, रासायनिक द्रव्य सहन करणारे, फरशी उचलताना पायावर पडून बोट तुटलेले, लाकडी फळ्या घासून शरीर सोलपटलेले, लोखंडी सळ्या उचलताना जीव मुठीत घेऊन काम करणारे, ऍसिडच्या दर्पामुळे कोंडून मेलेले रेल्वेच्या मालधक्क्यावरील कामगार. ह्या सर्वांचे आयुष्य आपल्याला यात पाहायला मिळते. इतके कष्ट करूनही त्यांच्या आयुष्यात फारसा फरक पडत नाही. त्यांना धड जेवायला बसायची जागाही नसते, इतकच काय तर साधी पिण्याच्या पाण्याची सोय देखील नसते तेदेखील त्यांना लांबून कुठून तरी आणावे लागत होतं. रेल्वेचे अधिकारी, व्यापारी, दलाल ह्या कोणालाही जरादेखील यांच्याविषयी दया वाटत नव्हती, उलट अपमानच पदरी पडत होता. पण तरीही फक्त जिवंत राहण्यासाठी हे सर्व ते सहन करत होते.

   जशी याठिकाणी कामगारांची दयनीय अवस्था होते तशी प्रत्येक ठिकाणी नव्हती. लेखकाच्या म्हणण्याप्रमाणे शिवाजी नगर गोडाऊन म्हणजे हमालांची अमेरिकाच होती. इथली कामगार कष्ट करत होते पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, सुख होतं, हास्य होतं. कारण इथे हमालांची सोसायटी होती. इथे त्यांना कामाची हमी मिळायची व कंत्राटदार आपेक्षा जास्त पैसे मिळायचे. इतकेच नव्हे तर कामगारांसाठी ना नफा ना तोटा पद्धतीने चालवलेली कॅन्टीन होती, कामगारांचे भजनी मंडळ देखील होते. त्यामुळे थोडंफार का होईना पण समाधान इथल्या कामगारांना होतं.

  अनिल अवचट यांनी मांडलेली परिस्थिती  ८० च्या दशकातील होती. पण त्यांनी केलेले वर्णन पाहता त्यांनी सांगितलेल्या कामगारांच्या, हमालांच्या समस्या, झोपडपट्टीतील जीवन बघता हे आजच्या काळात देखील तसंच आहे, असं वाटू लागतं. आपण आज एकविसाव्या शतकात राहत आहोत, आपल्या देशाने विज्ञान-तंत्रज्ञान या सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे, देशाचा आर्थिक विकास ही झाला आहे. आपली यांना चंद्र-मंगळावर जाऊन पोहोचली पण ह्या कामगारांच्या, झोपडपट्टीतील रहिवाशांच्या मूलभूत गरजांच्या यानांनी किमान उड्डाणाची तरी तयारी केली आहे का? 

क्रमशः

What's Your Reaction?

like
0
dislike
0
love
0
funny
0
angry
0
sad
0
wow
0