पुनर्भेट

पुनर्भेट

आजच्या या पुस्तकाला वयाच बंधन नाहीये. युवापिढी ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्या मनात घर करून राहील असं हे पुस्तक.....नीला सत्यनारायण लिखित ‘पुनर्भेट’ !

या पुस्तकाबद्दल जाणून घेण्याआधी आपण लेखिका नीला सत्यनारायण यांची थोडक्यात ओळख करुन घेऊ. नीला सत्यनारायण या निवृत्त सनदी अधिकारी आहेत. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त होत्या. यासोबतच त्या एक उत्तम साहित्यिकही आहेत. त्यांचे अनेक ललित लेख आणि काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत.

 "पुनर्भेट" हे पुस्तक एक अनुभवकथन आहे. फक्त ७५ रुपये मूल्य असलेलं, नानाविध सुंदर आणि भावूक करतील अशा अनुभवांनी सजलेल हे पुस्तक परचुरे प्रकाशनाचं आहे. 

पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखिका नीला सत्यनारायण यांच्या ग्रंथसंपदेची यादी आहे.

चांगली भूमिका, चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमीच आठवणीत, मनात आणि आयुष्यातही राहतात. धकाधकीच्या या जीवनात आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही माणसं तर इतकी जिव्हाळ्याची असतात की त्यांच्याबद्दल आपल्या मनात हळवा कोपरा असतो. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण पुन्हा यावेत असं आपल्याला नेहमी वाटत असतं. 

प्रस्तावनेमध्ये "पुनर्भेट" लिहिण्याचं कारण सांगताना लेखिका म्हणतात... "काही माणसांशी आपलं असलेलं नातं कुठंतरी अपूर्णच राहून जात. कधी गैसमजाने, मनाच्या दुराव्याने किंवा मग अकाली मृत्यूने. अशावेळी या दुरावलेल्या माणसाना पुन्हा भेटावंसं वाटतं. सगळं सांगून मोकळ व्हावंसं वाटतं... एकमेकांना दिलेल्या वेदना अश्रुंनी पुसून टाकाव्याश्या वाटतात.

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी खास माणसं असतातच, अनमोल क्षण असतात. प्रत्येकाने अशा माणसांचा किंवा अशा अनोख्या प्रसंगांचा खजिना सतत जवळ ठेवावा आणि तो पुन्हा पुन्हा उघडून पाहावा....त्यामुळे आपलं जीवन नक्की सुखद आणि आनंदमय होईल आणि याचसाठी 'पुनर्भेट'चा लेखनप्रपंच केला आहे."

थोडक्यात सांगायचं झालं तर या पुस्तकात लेखिकेने आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आठवणी आणि त्यांच्या पुनर्भेटीची इच्छा व्यक्त केली आहे. यामध्ये त्यांचे आई बाबा, शेजारी, बाबांचे मित्र, मायाळू मामाजी ते अगदी एकदा कामानिमित्त मदर तेरेसांची झालेली भेट. या सगळ्या आठवणींचा समावेश आहे. पुस्तकातील अनुभव वैयक्तिक असले तरी वाचक या लेखांशी समरस होतो. रोजच्या जगण्यातले, आपल्या माणसांचे हे अनुभव लेखिका अतिशय सुंदररित्या व्यक्त करतात. एका संवेदनशील मनाने केलेलं हे भावपूर्ण टिपण एक सुखद वाचनानुभव देते. सहज-सोप्पी पण मनाला थेट स्पर्श करून जाणारी भाषाशैली हे पुस्तकाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. 

काही माणसं पिंपळाच्या पानासारखी असतात.... त्यांची जाळी झाली तरी ती मनाच्या पुस्तकात जपावीशी वाटतात… अगदी आयुष्यभर ! अश्या व्यक्तींच्या आठवणींचा खजिना असलेलं हे पुस्तक नक्की वाचा आणि तुमच्या आयुष्यातील अश्या कोण व्यक्ती आहेत ज्यांना तुम्हाला पुन्हा भेटायला आवडेल, त्यांच्याबद्दल तुम्हीही लिहायला सुरवात करा. कारण ते पान पुन्हा पुन्हा उघडून पहाल तेव्हा ते तुम्हाला परमानंद देऊन जाईल.

- कांचन अशोक टाकसाळे

What's Your Reaction?

like
3
dislike
0
love
3
funny
0
angry
0
sad
0
wow
1