अभ्यासवाटिका, बाबासाहेब आणि मी

अभ्यासवाटिका, बाबासाहेब आणि मी

माझी आणि या जागेची ओळख फार आधीची… गेटवे ऑफ इंडिया किंवा नरिमन पॉईंटकडे जाताना अनेकदा इथून जाणं व्हायचं. त्यानंतर महाविद्यालय आणि NCC च्या कार्यालयाची इमारत सुद्धा इथे त्यामुळे हमखास इथून जाणं व्हायचं. बारावीला गटांगळ्या खाल्ल्यावर तर अजून जास्त झाली. बाबासाहेबांच्या ह्या पुतळ्याच्या डाव्या हाताला एक अभ्यासवाटिका आहे. बारावीच्या उरलेल्या विषय सोडवण्याच्या वर्षी जवळजवळ अनेक तास मी इथे अभ्यास करायचो. खरंतर हा चौक चारीही बाजूने सतत वाहनांची ये जा चालू असते तरीसुद्धा एखाद्या शांत जागी होणार नाही इतका चांगला अभ्यास इथे होतो. 

बारावी कशीतरी सुटली. ती ह्या जागेमुळेच असं वाटायला लागलं. (ह्याला अंधश्रद्धा म्हणू शकता) त्यामुळे पदवीच्या प्रत्येक परीक्षेआधी बरोबर एक महिना आधीपासून इथे येऊन शिस्तीत फक्त अभ्यास करायचो. पूर्वी फक्त गाईड वगैरे मध्ये लिहिलेलं रट्टा मारून जाणारा मी आता स्वतःची टिपणे काढायचो  त्याचा परिणाम म्हणून पदवीच्या एकाही वर्षात ना कधी KT लागली ना काठावर पास होण्याची वेळ. 

आता हे सर्व आज सांगण्याचं कारण "हे सर्व तिथे समोर असलेल्या बाबासाहेबांचा आशीर्वाद होता वगैरेमुळे झालं" हे नक्कीच नाही. असं म्हणणं त्यांच्या विचारांचा अपमान आहे. पण नेहमी वाटायचं "हा माणूस इतका शिकला. पार साता समुद्रापार जाऊन, त्या शिक्षणाचा वापर स्वतःपुरता मर्यादित न ठेवता स्वतःच्या समाजासाठी, देशासाठी केला, ऑगस्ट १९४७ रोजी जन्मलेल्या भारत ह्या भूखंडाला राज्यघटनेरूपी नियमांची, नैतिकतेची चौकटी दिली, सर्वांना समान संधी आणि रंजल्या गांजलेल्यांना स्वतःची ओळख मिळवून देण्यास प्रोत्साहन, नैतिक अधिकार दिले.


आपल्या उभ्या आयुष्यात हे इतकं आभाळभर कार्य कधीच होणार नाही पण जितकं हा माणूस ज्ञान प्राप्त करण्यासाठी शिकला, जितक्या पदव्या मिळवल्या त्याच्या काही प्रमाणात जरी आपण साध्य केलं नि आपल्याच सभोवतालच्या नागरिकांना त्यातील थोडंफार जरी देता आलं तरी एवढीही मानवंदना पुरेशी आहे ह्या महामानवाला"...

बाबासाहेब आंबेडकर  यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.

छायाचित्र आंतरजालावरून साभार.. 

What's Your Reaction?

like
2
dislike
0
love
1
funny
0
angry
0
sad
0
wow
0