गाव हा विश्वाचा नकाशा |  गावावरून देशाची परीक्षा |  गावची भंगता अवदशा |  येईल देशा || 

गाव हा विश्वाचा नकाशा |  गावावरून देशाची परीक्षा |  गावची भंगता अवदशा |  येईल देशा || 

तुकडोजी बाबांची ' ग्रामगीता ' ही आज गीता - ज्ञानेश्वरी प्रमाणे जनतेला खरं ज्ञान देऊन खेडोपाड्यात - झोपडी झोपडीत सुख समाधान पैदा करील, असा भरवसा वाटतो. आज अशा ग्रंथाची गावोगावी गरज आहे.  

- संत गाडगेबाबा

" आधुनिक काळामध्ये  'संत ' या महान पदवीला पात्र असे थोर पुरुष केवळ महाराष्ट्रात अथवा भारतातच काय पण सबंध जगामध्ये एका हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच असतील नसतील. तशा महान संतांमध्ये तुकडोजी महाराजांची गणना केली पाहिजे.  संत तुकडोजी महाराज म्हणजे चैतन्याचा मूर्तिमंत झरा, भक्तीचा साक्षात महापूर आणि मानवतेचा प्रत्यक्ष अवतारच होत. अत्यंत ओजस्वी आणि संपूर्ण मानवतावाद विचारांचा राष्ट्रसंत हा एक प्रचंड स्थंडीलच होता. त्यांची ती उज्वल शिकवण भारतीयांच्या अंतकरणावर शिलालेखासारखी कोरलेली राहील. "

- आचार्य अत्रे

थोर समाजसुधारक व संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म ३० एप्रिल १९०९ रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी झाला.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेनुसार भंडारा येथे 30 एप्रिल १९६१ रोजी ' ग्राम जयंती ' साजरी करण्यात आली होती.  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ' ग्रामगीता ' ग्रंथातून ग्रामविकासाचे सूत्रबद्ध असे विवेचन केले. भारत हा खेड्यांच्या देश. खेड्यातील माणसांवर लक्ष केंद्रित करून त्याचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि मानसिक विकास झाला पाहिजे यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा कटाक्ष होता. त्यासाठी ग्रामसुधारणेचा ध्यास राष्ट्रसंतांनी घेतला. भाषण व उपदेश यांच्यावरच न थांबता त्यांनी भंडारा जिल्ह्यातील आमगाव या गावाला भारतातील पाहिले आदर्श गाव करून दाखवले. त्या आदर्श गावाला पाहण्यासाठी भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, समाजवादी नेते राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण आले होते. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामविकासासाठी पथदर्शी ठरणारा व मानवी जीवनाचे कल्याण करणारा ' ग्रामगीता ' हा ग्रंथ लिहला. ग्राम विकासाची संकल्पना विशद करताना गावातील लोकांनी एकत्र येऊन लोक सहभागातून काम केले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना त्यांनी ग्रामनाथाची उपमा देऊन त्यांनी आपले लेखन शेतकऱ्यांना अर्पण केले आहे.देशाच्या सर्वांगीण विकासात ग्राम आणि कृषी संस्कृतीचा महत्वाचा वाटा आहे. ७० % लोकं खेड्यात राहतात. म्हणून खेड्याचा विकास हाच देशाचा विकास होय, अशी राष्ट्रसंत यांनी  भूमिका मांडली.  राष्ट्रसंत ग्रामगीतेत म्हणतात -

गाव हा विश्वाचा नकाशा | 
गावावरून देशाची परीक्षा | 
गावची भंगता अवदशा | 
येईल देशा || 

म्हणूनच राष्ट्रसंतांनी ग्राम सुधारणेवर भर दिला. ग्राम विकासाचा मूलमंत्र देणाऱ्या देणाऱ्या ग्रामगीतेत  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्राम विकासाकरिता ग्राम जीवनात श्रम, भांडवल, उत्पादन, पूरक उद्योग, बचत, बेकारी, स्वावलंबन, गोपालन, जीवन कला आणि जीवन शिक्षण या घटकांचा समावेश केला आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त ग्रामोध्दार समूह विनम्र आदरांजली अर्पण करीत आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे साहित्य डाऊनलोड करण्यासाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या !!

https://gramgeetatukdojimaharaj.blogspot.com/2017/06/normal-0-false-false-false-en-in-x-none_12.html

टीम ग्रामोद्धारद्वारा वरील लिंक वाचकांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावरील विस्तृत माहितीकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे.याची नोंद घ्यावी.

धन्यवाद !!!

What's Your Reaction?

like
5
dislike
0
love
2
funny
0
angry
0
sad
0
wow
1