पत्रास कारण की

पत्रास कारण की

 पत्रास कारण की – पुस्तक परीक्षण !! 

नमस्कार ! 

तुम्हाला प्रश्न पडू शकतो मी हेच पुस्तक का निवडल? याच उत्तर म्हणजे आपापसातला हरवलेला संवाद ! आता ई-मेल चा जमाना आहे. मेसेजेस आणि सोशल मीडिया मुळे आपण क्षणात लोकांपर्यंत पोहोचु शकतो पण तरीही पत्र हृदयातल्या हळव्या कप्प्यासारखी असतात. अजूनही कोणी पत्र पाठवल कि खूप छान वाटत. 

मेल वाचून माहिती कळते ,मनाचा अंदाज येत नाही. तो अक्षर वाचून येतो. पत्र ही जोडणारी गोष्ट आहे.ती जवळीक तो आपलेपणा ई-मेल मध्ये येऊ शकत नाही म्हणून पत्र खास आहेत. 

पत्र हातात घेण्यातलं सुख, ती आपुलकी काळाच्या ओघात हरवलीये. पत्रात जितकं मनमोकळं व्यक्त होता येत...तितकं इतर कुठल्याही माध्यमात होता येत नाही. हे आश्चर्य असल तरी तितकच महत्वाच सत्य आहे.

पत्राच आणखी एक विशेष असत, कधीकाळी जी पत्र वाचून तुम्ही रडलेले असता,ती पत्र काही काळानं पुन्हा वाचली की हसू येऊ शक. कधी काळी जी पत्र वाचून तुम्ही खूप हसला होता ,ती पत्र वाचून कालांतरानं भावुक व्हायला होतं. पत्र वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या भावना बनून जातात.

 पत्रांमध्ये मायेचा ओलावा असतो. हल्लीचे ईमोजी वापरूनही कदाचित भागणार नाही पण पत्राद्वारे सुप्त मनातील भावना सहज अलगद समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात. मोबाईल फक्त खिशात व्हायब्रेट होऊ शकतो, पण गदगदून हलवत ते पत्र!  

तंत्रज्ञानाच्या या आभासी जगात हरवलेला संवाद शोधण्यासाठी पुन्हा एकदा पत्र लिहायला सुरवात करण्याइतका उत्तम मार्ग असूच शकत नाही, म्हणूनच आज हा पत्रास कारण कि या पुस्तकाच्या परीक्षणाचा प्रपंच ! 

पुस्तक परीक्षण सुरु करण्याआधी आपण लेखकांबद्दल जाणून घेऊ. लोप पावत असलेली पत्रलेखन हि शैली पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर आणून महाराष्ट्राच्या घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनामनात पोहोचलेली व्यक्ती म्हणजे अरविंद जगताप. या आधीही ते अनेक माध्यमातून आपल्यासमोर आले, पण प्रत्येकाला भावले ते म्हणजे चला हवा येऊ द्या मधील पत्रांमुळे. साधी राहणी आणि उच्च विचार सरणी काय असते याची लख्ख जाणीव त्यांच्याकडे पाहिल्यावर होते. संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देश म्हणजे जिथे जिथे मराठी भाषा पोहोचलीये तिथे तिथे अरविंद जगताप यांचे चाहते आहेत.

पत्रास कारण कि हे पुस्तक ग्रंथाली प्रकाशनाच असून विविधतेने नटलेल आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पोस्टाची लाल पेटी आहे. पूर्वी या पेटीकडे पाहिलं तर मनात एक वेगळीच भावना असायची ! पत्र वाचता वाचता तुमच्यातला कोणी अचानक पेन घेऊन आपल्या आवडीच्या माणसाला पत्र लिहायला बसेल .... आपलं लिखाण नेमक्या पत्त्यावर पोहोचलाय याच मला समाधान होईल ...अस लेखक अरविंद जगताप यांनी मलपृष्ठवर लिहिलं आहे.

पुस्तकाची प्रस्तावना, प्रस्तावना अस न लिहिता मनोगत म्हणून स्वतः अरविंद जगताप यांनी लिहिलं आहे. पुस्तकात एकूण ४७ पत्रे आहेत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजेच शिवाजी महाराजांच्या पत्रापासून श्रीगणेशा होतो. हुतात्मे, रणरागिणीं ते दाभोळकऱ्यांचे मारेकऱ्यांपर्यंतची पत्र आहेत.सतत प्रत्येक गोष्टीत नावं ठेवणारी माणसं, आम्हा घरी धन, आपण वाया गेलेली माणसं , कोणता झेंडा घेऊ हाती ? अशी अनेक सणसणीत मायना असलेली पत्रे आहेत. वाढलेला सोशल मीडिया चा वापर , टीव्हीचा जन्म आणि आजवरचा प्रवास हे सारही यात आहे. एका गावात राहणाऱ्या मुलीने आई-बाबाना लिहिलेल पत्र अक्षरशः मन हेलावून टाकत. इंडिया उर्फ भारत देशाला उद्देशूनही एक पत्र आहे. आपल्या भारतातील दिग्गज कलाकार म्हणजे अगदी दादा कोंडकेंपासून ते आजच्या दीपिका पदुकोन पर्यंत अनेकांना पत्र लिहिली आहेत. अनेक राजकारणीहि कार्यक्रमात येऊन गेले त्यावेळी त्यांनाही पत्रे लिहिण्यात अली. बरं फक्त पत्रच नाही तर ....कीर्तनरूपी लेखांचाही यात समावेश आहे. बारिश नावाची सुंदर कविता या पुस्तकाची शोभा वाढवते. 

पुस्तकाची भाषा अगदी साधी-सरळ सोप्पी आहे. प्रत्येक लेखनामध्ये सहजता ओतप्रोत भरली आहे. शब्दरचना सखोल असून वाक्यरचना सुंदर आहे. प्रत्येक लिखाण अर्थपूर्ण आणि अभ्यासपूर्ण आहे, म्हणूनच कदाचित त्यामागची भावना काळजाला हात घालून जाते. 

हे पुस्तक आपल्याला जाणिवांच्या, अनुभवांच्या दुनियेत घेऊन जात. वास्तवाची जाणीव करून देत आणि विचार करायला लावत.  

एकदा एक पत्र वाचायला सुरवात केली की ते संपल्याशिवाय ठेवावंसं वाटत नाही. आणि एक पत्र संपलं की पुढचं पत्र वाचायचा मोह आवरत नाही. एकूणच हे पुस्तक म्हणजे भावभावनांचा सुंदर प्रवास आहे. यातली सगळीच पत्र तुमच्या मनात घर करून राहतील यात शंकाच नाही. तेव्हा नक्की वाचा पत्रास कारण की!!

                                                                                  -     कांचन अशोक टाकसाळे 

What's Your Reaction?

like
2
dislike
0
love
3
funny
0
angry
0
sad
0
wow
3